( अमळनेर शहर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२८ मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातीलसह गेल्या काही दिवसांपासून अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर पाण्याचे संकट कोसळले आहे. खरीपाच्या सुरुवातीला पावसाने मारलेली दडी आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान झालेच; पण आता सततच्या अवकाळी पावसामुळे उभ्या आणि कापणीस तयार झालेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर अमळनेरचे आमदार आणि राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे सध्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पत्र लिहून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.
आमदार पाटील यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की, अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ८१,२१२ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ४६,९४८ हेक्टरवरील कपाशी, २९,४१२ हेक्टरवरील मका, ३,५४४ हेक्टरवरील ज्वारी, ७४७ हेक्टरवरील बाजरी आणि २०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.शासनाच्या विद्यमान नियमांनुसार केवळ उभ्या पिकांचाच पंचनामा केला जातो; मात्र या वेळी शेतकऱ्यांच्या शेतात कापणी झालेली, परंतु शेतात पडून खराब झालेली पिकेही अवकाळी पावसामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांनाही ‘विशेष बाब’ म्हणून पंचनाम्यात समाविष्ट करून सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
“बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. शासनाने तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” असे आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, अमळनेर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनीही प्रशासनाकडे नुकसानभरपाईसाठी मागणी केली असून जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे...
=================================================

