(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी: अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१६ ऑगस्ट शनिवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील किन्हिराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर उखळे यांच्यावर मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी बेछूट हल्ला, मारहाण, शिवीगाळ आणि जीवघेणी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी चंदन ब्रह्मानंद राठोड याच्याविरुद्ध जऊळका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने आरोग्य विभागात संतापाची लाट उसळली असून, शासकीय सेवकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डॉ. उखळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात मानव विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. दुपारी सुमारे ११.४५ वाजता आरोपी राठोड हा शिबिरस्थळी येऊन 'गरोदर माता कार्ड' बनविण्याच्या कारणावरून अधिकार्याशी वाद घालू लागला. वादाच्या भरात त्याने संतापाचा अतिरेक करत सरकारी डॉक्टरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, बेदम मारहाण केली आणि प्लास्टिक खुर्ची उचलून फेकून सरकारी मालमत्तेची तोडफोड केली. एवढ्यावरच थांबता न राहता आरोपीने थेट जीव घेण्याची धमकी दिली.
या हल्ल्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना शारीरिक इजा व मानसिक त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम १३२, १२१(१), ३५१(२), ३५१ (३), ३२४(४) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गजानन श्रीराम काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या अमानुष प्रकारामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी संतप्त असून, "सरकारी सेवकांवर होत असलेल्या अशा हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आरोपींवर कडकात कडक कारवाई व्हावी" अशी मागणी सर्वत्र होत आहे. हा प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून संपूर्ण शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील थेट आघात असल्याचे मानले जात आहे.
===========================================
