(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२६ ऑगस्ट मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दुष्काळ पडल्यावर कर्जमाफीची घोषणा करणारे मुख्यमंत्री आज ओला दुष्काळ पडूनही काहीच बोलायला तयार नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर आमदार आणि खासदार निवडून येतात, त्याच शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय होत असल्याची खंत माजी आमदार बच्चू कडू यांनी अमळनेर येथे व्यक्त केली. ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित 'साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा'त बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, मगन पाटील, भास्कर बोरसे, किरण पाटील, प्रा. शेख आदी उपस्थित होते.
*'समाजात उदासीनता वाढली'*
आपल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षा गावातील गणपती बसवण्यासाठी जास्त लोक एकत्र येतात. ही समाजातील उदासीनता दर्शवते. मत चोरीला जाण्यापेक्षा समाजमनच चोरीला गेल्याचे त्यांनी नमूद केले. गावागावांत जात, धर्म आणि पंथ यामुळे शेतकऱ्यांची लढाई मोठी होत नाही. राजकीय निष्ठा इतकी वाढली आहे की, 'बाप मेला तरी चालेल, पण नेत्याला काही बोलायचे नाही,' अशी भूमिका घेणारे निष्ठावंत शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहेत, असेही ते म्हणाले.
*पुरस्कार वितरण*
या कार्यक्रमात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते माजी आमदार बच्चू कडू यांना 'साथी गुलाबराव पाटील पुरोगामी राजकीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना "सामाजिक पुरस्कारा" ने सन्मानित करण्यात आले.
*'सरकार आता मतदार निवडतेय'*
पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. 'देशात आधी मतदार सरकार निवडायचे, आता सरकार मतदार निवडतेय,' अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली. उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याबाबतच्या माहिती अधिकाराखालील अर्जावर राष्ट्रपती भवनाकडून 'आमच्याकडे कोणतीही माहिती नाही,' असे उत्तर मिळाल्याचे सांगत, त्यांनी या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महापुरुषांनी याच स्थितीसाठी संघर्ष केला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी जातीभेदाच्या नावाखाली तरुणांची माथी भडकवली जात असल्याचे सांगितले. सध्याची राजकीय स्थिती विदारक असली तरी धीराने काम केल्यास लोकशाही मूल्यांचाच विजय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.यावेळी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी गुलाबराव पाटील बापूंच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालवत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' या प्रार्थनेने केली. सूत्रसंचालन जे. एस. पाटील आणि विलास चौधरी यांनी केले.या कार्यक्रमात 'साथी संदेश वक्तृत्व करंडक स्पर्धे'तील विजेत्या विद्यार्थ्यांनाही रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला दिव्यांग बांधव, नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या साने गुरुजी विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, कन्या शाळा आणि अंगणवाडीतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले...
=========================================

