⭕ *ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्ती संकेतस्थळाची अकार्यक्षमता:– भिमराव महाजन ...अमळनेर येथे समता परिषदेच्या आंदोलनाचा इशारा...*🔘


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१३ मे मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी असलेले अधिकृत संकेतस्थळ गेल्या काही दिवसांपासून अकार्यक्षम झाल्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर समस्येबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव शाखेच्या वतीने अमळनेर येथील मा. प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात समता परिषदचे जळगाव जिल्हाउपाध्यक्ष भिमराव महाजन यांनी शासनाच्या तांत्रिक अकार्यक्षमतेकडे लक्ष वेधले असून, अनेक पात्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळ बंद असल्यामुळे अर्ज दाखल करता आलेला नाही. परिणामी, त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे संकेतस्थळावर अर्ज न झाल्यास ही संधी त्यांच्या हातून निसटण्याचा धोका आहे.

समता परिषदेकडून करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये –

१) शिष्यवृत्ती योजनेचे संकेतस्थळ त्वरित सुरु करणे,

२) अर्ज प्रक्रियेत अडथळा येणार नाही याची हमी घेणे,

३) आणि संकेतस्थळ बंद असल्यामुळे गमावलेला वेळ भरून काढण्यासाठी अर्जाची अंतिम तारीख वाढवणे – या मुख्य मागण्या आहेत.

    "शासनाने ही समस्या गांभीर्याने न घेतल्यास आणि तातडीने उपाययोजना न केल्यास, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या असून, आता शासन या बाबतीत किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

=========================================

Post a Comment

0 Comments