(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०४ सप्टेंबर गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील 'हैदराबाद गॅझेटिअर' संदर्भातील राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी अमळनेर येथील ओबीसी समाजबांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या निवेदनात, सरकारने मराठा समाजाला यापूर्वीच सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग अंतर्गत १० टक्के आरक्षण दिले असतानाही, दबावतंत्राला बळी पडून ५३ लाखांहून अधिक 'बनावट' कुणबी नोंदी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार ओबीसींच्या हक्कांवर अन्याय करणारा असल्याचं निवेदनात नमूद आहे. न्या.शिंदे समिती पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोप करत, सरकारने 'हैदराबाद गॅझेटिअर'वरील निर्णय त्वरित रद्द करावा, बोगस कुणबी नोंदी रद्द कराव्यात आणि न्या. शिंदे समिती बरखास्त करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. मनोज जरांगे यांच्या माध्यमातून सुरू असलेले आंदोलन घटनाबाह्य असून, राजकीयदृष्ट्या प्रबळ असलेल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणे म्हणजे मूळ ओबीसी समाजाला संपवण्याचा डाव असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. या गंभीर प्रकरणात सरकारने घटनात्मक तत्त्वांचा आदर करून ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवावे, अन्यथा समस्त ओबीसी समाज तीव्र आंदोलन करेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या निदर्शनावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन, माजी नगरसेवक फिरोज खा उस्मान खा, ॲड. सुरेश सोनवणे, समता परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक दिनेश माळी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष दिनेश शेलकर, नरेश कांबळे यांच्यासह विविध समाजांचे प्रतिनिधी आणि ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :–
" शासनाने ओबीसी समाजाच्या भावना समजून घेऊन तात्काळ शासन परिपत्रक रद्द करावे. अन्यथा यापुढे ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येऊन वेळ पडल्यास मुंबईदेखील जाम करण्यात येईल"
भीमराव महाजन-जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद जळगाव
=========================================

